माझ्या व माझ्या कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल करून नाहक छळ केला - सचिन पवार यांचा पत्रकार परिषदेत आरोप !


नवी मुंबई, प्रतिनिधी : पनवेल - कळंबोली येथील मैत्री सोसायटी भूखंडासाठी विकासक म्हणून मी सिडकोला माझी वैयक्तिक एक कोटी ५० लाख रुपयांहून अधिक रक्कम भरली, मात्र, माझ्या व माझ्या कुटुंबीयांचा नाहक छळ केला, खोटे गुन्हे दाखल करून मला अटक केली. आम्ही जगायचं कि मारायचं ? साहेब , आम्हांला न्याय द्या, अशी आर्त हाक देत खारघर येथील सचिन पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे. याबाबत राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. मैत्री सोसायटीच्या तोतया मुख्य प्रवर्तक व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर करावी, अशी लेखी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याची माहिती सचिन पवार यांनी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सदर प्रकरणी मैत्री सोसायटीच्या तोतया मुख्य प्रवर्तक व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर करावी, अशी मागणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे देखील एका लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचे सचिन पवार यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, सदर प्रकरणी न्यायालयात देखील याचिका दाखल करणार असल्याची माहिती यावेळी सचिन पवार यांचे वकील ऍड. हनुमंत झिमल यांनी यावेळी पत्रकारांना दिली. 


पत्रकार परिषदेत बोलताना सचिन पवार म्हणाले, सप्टेंबर २०१७ मध्ये सिडकोने नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या भूखंडासाठी जाहिरात काढली होती. त्या अनुषंगाने खारघर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सतीश मिसाळ, ललित  शिरसाट, विक्रम बेलोटे आणि त्यांचे इतर सहकारी माझ्याकडे आले. सदर भूखंड सिडकोकडून मिळविण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विनंती केली. सदर भूखंड मिळविण्यासाठी कागदपत्रे जमा करणे व सर्व सभासदांनी वैक्तिक दिलेल्या माहिती आधारे व कागद पत्रानुसार छाननी प्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडणे, व प्रत्येकवेळी सभासदांची रक्कम वेळोवेळी न जमा झाल्यास ती स्वतः विकासक म्हणून भरणे व सोसायटी नियमानुसार सर्व कायदेशीर कार्यवाही करून घेणे हे काम सर्वानुमते मला देण्यात आले. त्यामोबदल्यात भविष्यात भूखंड लागल्यास सोसायटीचा विकासक म्हणून बांधकाम करणे व भूखंडाच्या वाढीव चटई क्षेत्राचा मोबदला मला देण्याचे ठरले. 

पुढे,नितीन पवार यांची मुख्य प्रवर्तक म्हणून सर्वानुमते कायदेशीर नेमणूक करण्यात आली. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु करून सिडकोला नियोजित मैत्री सोसायटीच्या नावाने अर्ज केला. इसारा रक्कम २८ लाख २९ हजार दोनशे रुपये माझ्या अँपल किचन नावाने भरली. एक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर पाठपुरावा करून छाननी प्रक्रिया पूर्ण केली व भूखंड ऑक्टोबर २०१८ रोजी सिडको सोडत नुसार नियोजित मैत्री सोसायटीला मिळाला, असे सचिन पवार म्हणाले. 


सचिन पवार पुढे म्हणाले , सिडकोने भूखंडाची रक्कम  २ कोटी ८२ लाख ७२ हजार ४ रुपये २ पैसे आणि अधिक जी एस टी एवढी  निश्चित केली. भूखंड खरेदी करण्यासाठी प्रत्येक सभासदाने सुमारे १६ लाख रुपये काढण्याचे सोसायटीने ठरवले. दरम्यान, सुमारे १० सदस्यांनी सदर रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवून राजीनामे दिले. त्याबाबतचा कायदेशीर करार विकासक म्हणून माझ्यासोबत केला. त्यामध्ये सतीश मिसाळ यांची पत्नी प्रियांका आंधळे यांचा देखील समावेश होता. सदर सोसायटीमध्ये सतीश मिसळ यांनी पत्नीचे माहेरचे नाव देऊन सोसायटीत सभासदत्व घेतले होते. 

नितीन पवार हे मुख्य प्रवर्तक असताना सतीश मिसाळ सभासद नसताना मुख्य प्रवर्तक भासवून विजया  बँकेमध्ये खोटे खाते खोलले. काही सभासदांचे पैसे त्यामध्ये भरले. माझे नातेवाईकांकडून देखील रक्कम जमा करून घेतली. सदर बाब जेव्हा उघड झाली तेव्हा सतीश मिसाळ यांच्या सहमतीने व सर्व सभासदांच्या अनुमतीने सदर खात्यातील रक्कम माझ्या खात्यात सुमारे दीड कोटी रुपये वेळोवेळी वळविण्यात आले. त्यानंतर , सिडकोला माझे वैक्तिक दीड कोटी आणि सभासदांनी जमा केलेले दीड कोटी असे एकूण तीन कोटी रुपये सिडकोला भरणा केले. तसेच इतर २५ लाख रुपये खर्च माझ्या वैयक्तिक खात्यातून खर्च झाले, असे सचिन पवार म्हणाले. 


दरम्यान, सिडकोला माझ्या खात्यातून तीन कोटी रुपये भरणा केले असताना सतीश मिसाळ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर दीड कोटी रुपये अफरातफर केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला. व मला अटक केली. मात्र , त्यानंतर आमचा गैरसमज झाला असून आमचे ताळेबंद जुळले आहे. सचिन पवार यांना आम्ही एक  कोटी ८ लाख रुपये देणे लागतो असे सतीश मिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयासमोर प्रतिज्ञा पत्राद्वारे मान्य केले. तपासादरम्यान, दबाव टाकून समजोता करारनामा केला व  सर्व कागदपत्रे गुन्हा दाखल झाल्यावर तापसी अधिकारी श्री काळसेकर यांनी सर्व मूळ कागदपत्रे जमा करून घेतले. व मिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात दिल्याचे सचिन पवार यांचे म्हणणे आहे. न्यायालयीन कोठडीत असताना मला भय दाखवून  प्रसारमाध्यमांकडे , न्यायालयात जाणार नाही, असे लिहून घेतले. माझ्या व माझ्या कटुंबाच्या जीवाला निर्माण झालेल्या धोक्यामुळे मी त्यावेळी लेखी मान्य केले.  त्यानंतर न्यायालयाने मला जामीन मंजूर केला. 

माझे दीड कोटी न देता उलटपक्षी मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयन्त केला. मी नातेवाईकाकांकडून, कर्ज काढून पैसे भरले .शेती गहाण ठेवून पैसे भरले. मात्र , या सतीश मिसाळ आणि त्यांच्या पोलीस सहकार्यामुळे माझ्या वाट्याला प्रचंड पश्चताप, मानसिक त्रास आला आहे. यामुळे माझे कुटुंब उध्वस्थ झाले. मी कर्जबाजारी झालो. अपघाताने जीव घेण्याच्या धमक्या येतायत . मी आणि माझ्या कुटुंबाने जगायचं कसं ? आम्हाला मारून टाका नाहीतर न्याय तरी द्या, अशी भावना सचिन पवार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री , नवी मुंबई पोलीस आयुक्त व खारघर पोलिसांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया सचिन पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त दिली.