शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री.जे. एम. म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शनिवार, 10 मे रोजी उलवे नोड येथे पार पडला.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार पंडीतशेठ पाटील,भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, मा.रा.जी.प. उपाध्यक्ष आस्वादशेठ पाटील, तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थकांनी उपस्थित राहून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
याप्रसंगी जाहीर सभेला संबोधित करताना भाजपा कार्यकारी अध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश रविंद्र चव्हाण यांनी सांगितले "देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाची तर राज्याचे कुशल नेतृत्व मुख्यमंत्री फडणवीस राज्याची ताकद आहे. त्यांच्या नेतृत्वात देश आणि राज्य पुढे यशस्वी मार्गक्रमण करत आहे. तळागाळातील कार्यकर्ते समाज बांधवांच्या समस्याचे निराकरण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. सन २०४७ ला आपला देश महासत्ता होणार आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा असला पाहिजे यासाठी सन २०२८ च्या अगोदर तीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट देवेंद्रजीनी ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाही. जे. एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांनी त्यांच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अशा या पक्षात तुम्ही आज सहभागी झाला आहात याचा निश्चित तुम्हाला अभिमान वाटेल.
आपल्या भाषणात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की ,मा.नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व आहे. भाजप जिल्हयात एक नंबरचा पक्ष बनत आहे. खासदार, आमदार, ते सरपंच लोकप्रतिनिधी तळागाळातील लोकांसाठी काम करत आहेत. २०१८ साली रविंद्रजी चव्हाण रायगडचे पालकमंत्री झाले आणि जिल्ह्यातील एक एक करत निवडणुका जिंकत गेलो. आता प्रत्येक स्तरावर भाजपचे नेतृत्व आहे. कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार जनतेसाठी अग्रेसरपणे काम करत आहे. देश हितासाठी काम करणाऱ्या पक्षात आलो आहोत याचा तुम्हाला नक्कीच समाधान आणि अभिमान वाटेल. पनवेल, उरण, खालापूर मधून तुमच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
प्रितम म्हात्रे हे समाजाला जोडले आहेत तर जे. एम. म्हात्रे पक्षभेद बाजूला ठेऊन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सोबतीने काम करत आहेत. आजच्या या प्रवेशाने ताकद वाढली आहे. आजचा पक्षप्रवेश आणि झेंडा देशप्रेमाचा आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका शंभर टक्के जिंकणार याची मला खात्री आहे. पक्षात जुना नवा असा कोणताही विचार न करता एकसंघ काम करत राहू या असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले
जे एम म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांच्यासोबत शेकापचे विविध पदाधिकारी, जिल्हा चिटणीस, आघाड्यांचे प्रमुख, मा.नगराध्यक्ष, मा.उपनगराध्यक्ष, मा. नगरसेवक, मा.जिल्हा परिषद सदस्य, मा.पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भविष्यातील राजकीय घडामोडींना दिशा देणारा हा पक्षप्रवेश म्हणून रायगड जिल्ह्यात पाहिले जात आहे.
कोट
*19 मा.नगरसेवक, 4 मा. जिल्हा परिषद सदस्य, 4 मा.पंचायत समिती सदस्य,3 मा.नगराध्यक्ष, 2 मा. उपनगराध्यक्ष, 26 सरपंच,18 उपसरपंच,63 ग्रामपंचायत सदस्य, असे आजी आणि माजी अनेक पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी माझ्यासोबत भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या विभागात आंतरराष्ट्रीय दि बा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ बनत आहे , हजारो रोजगार या ठिकाणी भविष्यात येणार आहे.आपल्या विभागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात येथे नोकरीची आणि व्यवसायाची संधी आहे. रायगड जिल्ह्यात नव्याने उद्योगधंदे येत आहेत या ठिकाणी खूप मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. त्या ठिकाणी आवश्यक ते मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण योजना आहेत त्या राबवून काम करण्याचा माझा मानस आहे*
प्रितम जनार्दन म्हात्रे
मा.विरोधी पक्षनेता
(पनवेल महानगरपालिका)