जगाच्या इतिहासात प्रत्येक कर्तबगार पुरुषांच्या कर्तृत्वात त्यांच्या पाठिराख्या स्त्रीचा सहभाग महत्तम असतो.
भीमरावांना बाबासाहेब बनविणारी, बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेब ठरविणारी, डॉ.बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे निर्माते म्हणून घडवणारी माता रमामाई आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सच्ची सहचारिणी,त्यांची मार्गदाती होय. डॉ.आंबेडकरांच्या सुखदुःखात सहभागी होणारी,त्यांचे जीवन घडवणारी,त्यांना सदोदित प्रोत्साहित करणारी आणि बाबासाहेबांना एक महान क्रांतियोद्धा बनविणारी माता रमामाई आंबेडकर खरोखरच एक युगनिर्माती होय.
दाभोळ जवळील वलंग गावातील भिकू दामू धुत्रे-वलंगकर यांच्या घरी ७ फेब्रुवारी १८९८ रोजी एक कन्यारत्न जन्मले.तिचे नाव रामी ठेवण्यात आले.
रामी ही दिसावयास देखणी,सुस्वरूप होती.रामीची आई रुख्मिनीबाई यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे रामीसह इतर तीन भावंडांचे भिकू धुत्रे यांनी अत्यंत हलाखीत पालनपोषण केले. मातृछायेविना पोरकी ही चार भावंडे तशातच भिकू धुत्रे यांच्या मृत्यूमुळे आणखी पोरकी झाली.
एकुलता एक आधार गेल्याने या भावंडांवर संकटाचा हिमालय कोसळला होता.मामा व काकांनी या लहानग्यांच्या सांभाळ केल्यामुळे दुःखाच्या लाटा थोड्याश्या सुसह्य झाल्या. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमुळे छोट्या रामीस लहानपणापासून काटकसरीची सवय लागली.पुढे रामीबाईंचे वयाच्या नवव्या वर्षी भिवराव या निवृत्त सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या सुपुत्रा सोबत लग्न झाले. मुंबईतील भायखळ्याच्या मच्छली बाजारात हा विवाह सन १९०६ मध्ये अत्यंत साधेपणाने पार पडला.आणि तेथूनच रामीबाईंच्या जीवनास कलाटणी मिळाली. माहेरच्या रामीबाईची सासरी रमाबाई झाली अन हीच रमामाई बाबासाहेबांसाठी प्रिय अशी 'रामू' बनली.
डॉ.बाबासाहेब रमामाईस प्रेमाने ' रामू ' म्हणत असत तर रमाईंनी जन्मभर बाबासाहेबांना आदराने, सन्मानाने 'साहेब' म्हणून संबोधले.बाबासाहेबांचा विवाह जरी रमामाई सोबत झाला असता तरी त्यांचा वास्तविक विवाह विद्याग्रहणाशीच झाला होता.ते सतत अभ्यासरत राहत,रात्रंदिवस वाचन करीत,तरी रमामाई कसलाही त्रागा करून न घेता बाबासाहेबांची सदैव सेवा करीत असे. बाबासाहेबांची रमामाई सुसंस्कारी, सदाचारी,सुस्वभावी व कर्तव्यदक्ष होती.
डॉ. बाबासाहेब विदेशातून उच्चपदव्या संपादन करून आल्यामुळे स्त्रीसुलभ कल्पनेप्रमाणे रमामाईस वाटायचे की,आपल्या पतीने आता संसारात लक्ष द्यावे,चांगली नोकरी करून घर सांभाळावे. परंतु विद्येचा व समाजक्रांतीचा वसा घेतलेल्या बाबासाहेबांना एकट्याच्या संसारात रस नव्हता,त्यांना लाखो-करोडो, दलित-उपेक्षितांचे संसार उभारवयाचे होते.पतीचा विद्यार्जनाचा, समाजसेवेचा ध्यास पाहून कधी-कधी रमामाईस मनस्ताप व्हायचा परंतु आपला पती एवढा उच्च विद्याविभूषित आहे,याचा तिला मनस्वी अभिमान वाटायचा.बाबासाहेब नेहमी वाचण्यात तल्लीन राहत असल्यामुळे रमामाई साहेबांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायच्या.बाबासाहेबांच्या वाचनाच्या वेळेत त्या साहेबांच्या जेवणाची काळजी घेत,साहेब वाचन करीत असताना एवढे तल्लीन होत की त्यांना तहानभूक जाणवत नसे
त्यामुळे रमामाई अनेकदा त्यांना जेवणासाठी विनंती करत,आग्रह करीत परंतु तरीही बाबासाहेबांना जेवणाचे भान राहत नसे, पतीने जेवण केले नाही म्हणून ही सहचारिणी देखील उपाशी राहत असे.एवढी त्यागी, पतिनिष्ठ होती रमामाई!
बाबासाहेब विदेशात शिकावयास असतांना अगदी थोड्याश्या पैशात रमाई आपला सांसारिक गाडा चालवायची.त्यासाठी तिने स्वतः डोक्यावर शेण वाहून,गोवऱ्या बनून,त्या विकून,कोळसे विकून आपल्या संसाराला हातभार लावला.एवढ्या उच्चशिक्षित बॅरिस्टरची पत्नी परंतु तिने कष्ट करण्यात कधी संकोच केला नाही. बाबासाहेबांनी रमामाईंच्या या धडपडी विषयी विचारणा केली असता तिने उत्तर दिले, 'आपले घर काटकसरीने चालविण्यासाठी, शेणाच्या गोवऱ्या विकण्याच्या घरच्या कामासाठी कसली लाज आली?'
रमामाईस बाबासाहेबांनी बरेचदा शिकवण्याचा प्रयत्न केला.परंतु तिने शिक्षणात कोणतीच रुची दाखवली नाही.तिच्या मते, वडीलधाऱ्यांचा आदर, पतीची मनोभावे सेवा करणे आणि पती हितासाठी आपले जीवन पतिनिष्ठ म्हणून समर्पित करणे,हेच स्त्रीचे सर्वोच्च कर्तव्य आहे.आणि या तत्त्वावरच रमाई जीवनभर जगली!
अशा दुःख,दैन्य, दारिद्र्यात जगलेल्या परंतु बाबासाहेबांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या रमामाई विषयी बाबासाहेबांनी 'बहिष्कृत भारत' मध्ये म्हटले आहे , 'मी विदेशात असताना तिने रात्रंदिन आपल्या प्रपंचाची काळजी वाहिली व वाहत आहे अशा रामूने मी विदेशातून परत आल्यावरही विपन्नावस्थेत शेण स्वतःच्या डोक्यावर वाहून नेण्यास जिने मागेपुढे पाहिले नाही अशा अत्यंत ममताळू , सुशील,पूज्य स्त्रीच्या सहवासात मला जास्त वेळ घालवता येत नाही, याचे मला दुःख होते.'
रमाई केवळ बाबासाहेबांच्या संसारात रमल्या नाहीत तर त्यांची इच्छा असायची बाबासाहेब जिथे-जिथे जातील तिथे-तिथे आपण त्यांच्या सोबत सावलीसमान जावे. हृदयात पतीच्या सुरक्षितते विषयी चिंतेची शेकोटी सतत धगधगत असल्यामुळे सभेची व परिषदेची आमंत्रणे देवून आपल्या पतीला विश्रांती न देता धोक्याच्या ठिकाणी नेणाऱ्या लोकांचा रमाईंना क्षणिक राग येई.
त्यामुळे बाबासाहेबांसोबत जाण्याचा त्यांचा उद्देश म्हणजे पतीची सुरक्षितता हा होता.स्वभावाने शांत असलेल्या,बोलण्यात विनयशील, गंभीरवृत्तीच्या,प्रकृतीने जेमतेम पण संसारात व्यवहारदक्ष असलेल्या रमाईच्या मनात पतीविषयी अपार श्रद्धा , प्रेम,काळजी होती.
जीवनातील कटू-गोड अनुभव घेत रमामाई बाबासाहेबांसोबत सांसारिक आयुष्य जगत होत्या.१९२४ पर्यंत त्यांच्या संसाराच्या वेलीवर एकूण पाच अपत्ये फुलली होती. त्यापैकी यशवंत सोडून बाकी सर्व दोन-अडीच वर्षाचे अल्पायुषीच ठरले होते.छोटा ' राजरत्न' या दाम्पत्यास अत्यंत प्रिय होता.परंतु १९ जुलै १९२६ ला न्युमोनिया होऊन त्याचा मृत्यू झाला.त्यामुळे रमामाई- बाबासाहेबांवर आस्मानच कोसळले,रमामाई तर पुत्रवियोगाने कासावीस झाल्या होत्या.तशातच पतीच्या जीवाला असणाऱ्या धोक्यामुळे तिच्या आजारपणात आणखी भर पडत होती.तरी ती आजारपणातही स्वतःच्या तब्येतीपेक्षा आपल्या पतीची जास्त काळजी घेत होती.रमामाई पतीच्या सुरक्षिततेसाठी उपवास करायची.एकदा तिने पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन घेण्याची इच्छा बाबासाहेबांसमोर प्रदर्शित केली.परंतु बाबासाहेब ओळखून होते की, स्पृश्यांच्या त्या मंदिरात या अस्पृश्य स्त्रीस बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल.त्यामुळे स्वाभिमानी बाबासाहेबांनी आपल्या पत्नीस होणाऱ्या संभाव्य अवहेलनाची कल्पना देऊन तिला पंढरपूरला नेण्यास नकार दिला.त्या वेळी बाबासाहेब मोठ्या आवेशपूर्ण उद्गारने म्हणाले,' जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्ती पासून दूर लोटते,त्या पंढरपूरची कथा ती काय ? आपल्या उभयतांच्या पुण्याईने स्वार्थत्यागाने,सेवेने ह्या दलितांसाठी आपण दुसरी पंढरी निर्माण करू !' आणि डॉ. आंबेडकरांनी आपल्या अर्धांगिनी च्या अमुल्य सहकार्यने करोडो दलितांच्या जीवनात क्रांती आणली,नागपूरची दीक्षाभूमी ही पंढरपूर पेक्षा ही महान क्रांतीभूमी ठरवली.
अखेर मृत्यूपूर्व सहा महिने अंथरूणास खिळलेल्या या समाधानी वृत्तीच्या,मनाच्या औदार्याच्या,शुद्ध चारित्र्यच्या,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेचा आणि कोट्यवधी दलितांची माऊलीची दिनांक २७ मे १९३५ रोजी प्राणज्योत मालावली आणि एक युगप्रवासाचा अंत झाला. बाबासाहेब दुःखातिशयाने विव्हळत एक खोलीत आठवडाभर अक्षरशः लहान मुलासारखे ओक्सीबोक्सी रडत राहिले,एवढे जीवापाड प्रेम होते या महापुरुषाचे रमामाईवर ! त्यांच्या ऐश्वर्याची मनोदेवता, मानवतेची सेवा करणाऱ्या महापुरुषांची ती अर्धांगिनी, भवसागराच्या प्रवासातील ती सहचारिणी कायमची लुप्त झाली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्नीप्रति कृतज्ञता म्हणून १९४० साली प्रकाशित केलेला 'थॉट्स ऑन पाकिस्तान' हा वैचारिक ग्रंथ रमामाई आंबेडकर यांना अर्पित केला.
अशा या कोट्यवधी भारतीयांच्या मातेच्या- माता रमाईच्या १२१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
💐💐💐💐💐💐
