आंबेडकरी चळवळीचे सेनापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे

-: आजचा दिनविशेष :-


 


आज दि. २५ सप्टेंबर. 


 


   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, राज्यसभेचे माजी उपसभापती, आंबेडकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, राष्ट्रीय नेते व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची आज जयंती. जयंती निमित्त बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन......! व कोटी कोटी प्रणाम.......!!


 


राजाभाऊंचा जन्म दि. २५ सप्टेंबर १९२५ रोजी अतिशय श्रीमंत अशा कुटुंबात झाला. राजाभाऊंचं मूळचं नाव भाऊराव देवाजी खोब्रागडे. जन्म चंद्रपुरातला. वडील देवाजी बापू खोब्रागडे हे लाकूड वखारीचा व्यवसाय करणारे. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे शंभर हत्ती होते. इतकी श्रीमंती होती. पण त्यासोबत आंबेडकरी विचारांचीही सोबत होती. १९३६ साली बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली. ते जिंकण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे त्यांच्या विरोधातील सवर्णांनी त्यांच्या वखारीला आग लावली होती. १२-१३ वर्षांचा लहान राजाभाऊ हे पाहात होता. फक्त जातीपायी नेतृत्वाच्या आणि पुढे जाण्याच्या संधी नाकारल्या जात आहेत, हे पाहून ते स्वाभिमानाची दीक्षा देणार्‍या आंबेडकरी चळवळीत उतरले. 


 


१९४३ साली बाबासाहेब एका परिषदेसाठी चंद्रपुरात आले होते. तिथे गेस्ट हाउसमधे राजाभाऊ ज्ञानसागराला भेटले. बाबासाहेबांनी १९४६ साली दलित विद्यार्थ्यांची १४ जणांची पहिली टीम लंडनला शिकायला पाठवली. त्यात राजाभाऊ होते. तिथून ते बॅरिस्टर बनून १९४९ साली परतले. पण चंद्रपूरसारख्या ठिकाणी त्यांना हॉटेलमधे चहाही कुणी देईना. पण शांत बसतील ते राजाभाऊ कसले. कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी त्यांनी चंद्रपुरात १५-२० हॉटेलं काढून दिली. चंद्रपुरातल्या स्थानिक राजकारणात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. 


 


बाबासाहेबांनी १९५५ साली त्यांना शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवले. देशातील सर्व काँग्रेसविरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक विरोधी पक्ष स्थापन करावा, यासाठी बाबासाहेब प्रयत्न करत होते. राजाभाऊंनी त्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ते यशस्वी झाले नाही. २३ मार्च १९५८ साली ते राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून निवडले गेले. त्यानंतर पुन्हा एकदा ते राष्ट्रपती नियुक्त खासदार बनले. तर एकदा विरोधी पक्षातर्फे महाराष्ट्रातील आमदारांनी त्यांना राज्यसभेवर निवडून दिले. असे एकूण १८ वर्षं ते राज्यसभेवर होते. १९७० साली ते राज्यसभेचे उपाध्यक्ष बनले. 


 


१९६६ साली कृष्णवर्णीय नेत्यांच्या परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून इंदिरा गांधींनी आवर्जून राजाभाऊंना अमेरिकेला पाठवले होते. तिथे त्यांनी दलित आणि निग्रोंच्या प्रश्नाचा उहापोह तर केलाच पण जागतिक स्तरावर सर्व वंचितांनी एकत्र येण्याची आवश्यकता स्पष्ट केली. असं जग गाजवत असताना ते आंदोलनांमध्येही भाग घेत होते. भूमिहीनांच्या आंदोलनासाठी ते आग्रही होते. शेतीचे राष्ट्रीयीकरण व्हावे, असे त्यांचे मत होते. खाणकामगार आणि विडी कामगारांच्या युनियनचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मुंबई आणि दिल्लीत मोर्चे काढून त्यांच्यासाठी अनेक अधिकार मिळवले. नवबौद्धांना सवलती मिळाव्यात यासाठीचे त्यांचे आंदोलनही यशस्वी झाले. नवबौद्ध विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यासाठी राज्य सरकारला त्यांनी भाग पाडले. हुंडाबळीचा कायदा व्हावा यासाठी त्यांनी संसदेत खूप प्रयत्न केले. 


 


विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात यावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. संसदेतही त्यांनी महाराष्ट्राची बाजू जोरदार उचलून धरली. मध्य प्रांतवादी आणि स्वतंत्र विदर्भवाद्यांनी त्यामुळे त्यांना खूप त्रास दिला. पण राजाभाऊ महाराष्ट्राच्या बाजूने अभेद्य राहिले. त्याकाळात चंद्रपूरच्या गांधी मार्गावरचे त्यांचे घर हे संयुक्त महाराष्ट्राचा मोठा अड्डा बनले होते. एसेम जोशींपासून आचार्य अत्रेपर्यंत सर्व दिग्गज नेत्यांनी या घराला भेट दिली आहे. पण पुढे महाराष्ट्रात विदर्भावर होणार्‍या अन्यायाने ते खूप व्यथित झाले. सत्तरच्या दशकात त्यांनी स्वतंत्र विदर्भाची आणि छोट्या राज्यांची भूमिका मांडायला सुरुवात केली. 


 


१९७१ साली साहित्य संमेलनाचं यजमानपद. रिपब्लिकन ऐक्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आणीबाणीला त्यांनी प्रचंड विरोध केला. जनता लाटेत त्यांचे दोन खासदारही लोकसभेवर निवडून गेले. बुलढाणा मतदारसंघात त्यांचे कार्यकर्ते दौलतराव गवई यांनी रा. सू. गवई गटाच्या काँग्रेसपुरस्कृत उमेदवाराचा पराभव केला. तर मध्य प्रदेशातल्या बालाघाट मतदारसंघातून त्यांचे उमेदवार कचरूलाल जैन निवडून आले. 


 


उत्तुंग कर्तृत्व, कार्यकर्त्यांचं जाळ, विद्वत्ता आणि प्रामाणिकपणा असूनही राजाभाऊंचे नेतृत्व विदर्भाच्या एका भागाबाहेर बहरू शकले नाही. ते दिल्लीतच अधिक रमले. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य दलित जनतेला त्यांच्याविषयी प्रचंड आदर असूनही त्यांना आपले थेट नेते मानले नाही. ९ एप्रिल १९८४ रोजी दिल्लीतल्या लोधी इस्टेटमधील घरी त्यांचे निधन झाले.


 


आंबेडकरी चळवळीला आपल्या कर्तृत्वाने जनाधार आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे एक महान नेते म्हणून राजाभाऊ खोब्रागडेंचा नाव अग्रक्रमाने घ्यायला हवं. बाबासाहेबांनी स्थापलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस आणि राज्यसभेचे उपसभापती अशी मोठी पदं भूषवलेल्या राजाभाऊंचं काम महाराष्ट्राच्या समाजजीवनात महत्त्वपूर्ण आहे. म्हणून त्यांना आंबेडकरी चळवळीचा राजा म्हटले जाते.


 


त्यांच्या या उत्तुंग अशा कार्याला मानाचा जयभिम व जयंती निमित्त विनम्र अभिवादन..........! 🙏