महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम २६४ अन्वये खारघर व तळोजा येथील इमारती धोकादायक घोषित केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळीराम नेटके यांनी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांना या संदर्भात सूचना केल्यानंतर पालिकेने संरचना परीक्षण (Structural Audit) करून घेण्यास मुदत वाढ दिली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम २६४ अन्वये खारघर व तळोजा येथील इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. परंतु महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम २६५ (अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन ३० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना परीक्षण (Structural Audit) करून घेणे आवश्यक आहे.
प्रभाग समिती "अ" चे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी आज खारघर मधील संबंधित सोसायटी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी महाड दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार घाईघाईने नोटिस बजावण्यात आल्या असल्याचे कबूल केले. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमार्फत सुधारित नोटीस देण्यात येईल असे सांगितले.
यावेळी विविध सोसायटी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघरचे बळीराम नेटके व अजिनाथ सावंत सरचिटणीस, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस,ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष विजय मयेकर तसेच महिला सेल राजश्रीताई कदम उपस्थित होते.